ठाण्यातील पहिल्या फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण

‘तलावांचे शहर’ अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात अनेक तलावांसोबतच लोकांना फिरण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक बागबगीचे, मॉल्स आहेत. रविवारी व इतर सुट्ट्यांच्या दिवशी या गार्डन व मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसून येते. तसेच बदलत्या काळासोबतच नागरिक आपल्या सुदृढ व निरोगी आरोग्याबद्दल जागरूक होत असल्यामुळे पहाटेपासूनच उद्यानांमध्ये अनेकजण मॉर्निंग वॉक, व्यायाम व योग-प्राणायाम करताना दिसतात. एकंदरीतच रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विसावा मिळावा, यासाठी दररोज सकाळी अथवा संध्याकाळी उद्यानात एकतरी फेरफटका मारण्याला सर्वसामान्यांकडून अधिक पसंती दिली जाते. म्हणूनच ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १९ मध्ये सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या विशेष प्रयत्नाने ‘फुलपाखरू उद्यान’ सुरु करण्यात आले आहे. या उद्यानाचे लोकार्पण ८ फेब्रुवारीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नव्याने सुरु करण्यात आलेल्या या ‘फुलपाखरू’ उद्यानाच्या जागेत यापूर्वी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य होते, कचऱ्याचे ढीग साचत होते. मात्र आता त्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक फुलझाडांची रेलचेल असेलेले ‘फुलपाखरू उद्यान’ उभारण्यात आले आहे. या उद्यानात फुलपाखरे आकर्षित होण्यासाठी पेंटास, करवंदा, लॅण्टना येलो, लॅण्टना हळदीकुंकुंम, लॅण्टना लॅव्हेंडर अँण्ड व्हाईट, पावडर पफ, फॅमिलीया, क्युफिया, इक्सोरा, पिंक,रेड ही झाडे लावण्यात आली आहेत. तसेच रॅफिज पामची झाडे ही लावण्यात आली असून या झाडांमध्ये फुलपाखरे लपून राहतात. यामुळे दररोज सकाळी या उद्यानात फुलपाखरांचे मनमोहक थवेच्या थवे नागरिकांना पाहायला मिळतात. यासोबतच या उद्यानात नागरिकांना फिरण्यासाठी पदपथ, लॉन, हँगिंग ब्रिज उभारण्यात आले आहे. विविध सुविधांनी परिपूर्ण अशा या उद्यानात नागरिकांसाठी ओपन जिम तयार करण्यात आले आहे, त्याचबरोबर पांढरे,लाल, निळे, पिवळे, गुलाबी अशा विविध रंगाच्या कमळ फुलांसाठी पाण्याचे पॉट तयार करण्यात आले आहेत.

या उद्यानाच्या लोकार्पणाप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश मस्के, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के,शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, स्वच्छता व गलिच्छ वस्ती सुधार समिती सभापती पूजा करसुळे, नगरसेविका विमल भोईर, नम्रता फाटक,जयश्री फाटक, नगरसेवक राजेंद्र साप्ते,उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपनगर अभियंता सुनील पोटे,मनोरूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.गौरी राठोड,सहाय्यक आयुक्त महादेव जगताप,प्रा.प्रदीप ढवळ,अधीक्षक संजय बोदाडे,विलास जोशी आदी उपस्थित होते.