NWC प्रतिनिधी:
मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेचा नामकरण सोहळा संपन्न.

    भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नं १ शाळेचा नामकरण सोहळा मंगळवार २५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. या शाळेत  मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेतील विविध वर्गात शिकणाऱ्या तब्बल ४४ विद्यार्थांनी प्रवेश घेतल्याने आता जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी-पालकवर्ग उत्सुक असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.
    कार्यक्रमा प्रसंगी उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, शिक्षणाधिकारी संगीता भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंजुषा जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की शहापूर सारख्या भागात आंतरराष्ट्रीय शाळा उभारली जाते याचा आम्हाला अभिमान असून आंतरराष्ट्रीय शाळेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लागणारी सर्वोतोपरी मदत केली जाईल. तसेच राज्यातील पहिल्या १३ शाळांपैकी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची निवड केल्या बद्दल त्यांनी शासनाचे आभार देखिल व्यक्त केले. तर यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार म्हणाले की, सध्या असणाऱ्या शाळेच्या दुरुस्तीसाठी ५ लाख मंजूर करण्यात आले असून शाळेची भौतिक दुरुस्ती लवकर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय या आंतरराष्ट्रीय शाळेमुळे ग्रामीण भागातील मुल उच्च  दर्जाचे शिक्षण घेतील असेही ते म्हणाले. यावेळी भीमनवार म्हणाले, समाजात बदल घडवण्यासाठी सामजिक नेतृत्व उभं राहावं लागत तसं शाळेची प्रगती होण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. या आंतरराष्ट्रीय शाळेसाठी शिक्षकांनी दाखवलेल्या पुढाकारामुळे भविष्यात ही आंतरराष्ट्रीय शाळा राज्यात आदर्शवत ठरेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सगळ्या शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन केले.  शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडेल असेही ते म्हणाले. या शाळेत सध्यपरिस्थितीत ७ वर्ग खोल्या असून ६ वर्ग खोल्या वापरात आहेत. शाळेत एकूण ६ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत बालशिशू वर्ग व पहिली ते तिसरीचे अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचे वर्ग आहेत. शिशू वर्गात ९० मुल शिकत आहेत. तर पहिलीचा ४५, दुसरीचा ४३, तिसरीचा ३१ मुलांचा पट आहे. ग्रामसभेत ग्रामपंचातीने ठरव करून ५ एकर जागा या शाळेसाठी दिली आहे. या जागेवर इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचे इमारत बांधणे प्रस्तावित आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकांशी साधला संवाद
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अंतगर्त या शाळा  सुरू झाल्या असून शाळेचा अभ्यासक्रम संशोधन पद्धतीचा असणार आहे. त्यामुळे कार्यक्रमा नंतर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर भोईर आणि इतर सर्व शिक्षकांशी संवाद साधत आगामी काळातील नियोजन विषयी जाणून घेतले. नाविन्य काय करता येईल या विषयी चर्चा केली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य,  तालुक्यातील अधिकारी वर्ग तसेच ग्रामस्थ, पालक विद्यार्थी उपस्थित होते.