पालघर लोकसभेसाठी युती विरोधात कोंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीने हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला असून, बाविआ तर्फे माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा मतदार संघात ३ आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस ची साथ आणि परंपरागत मतदारांमुळे लोकसभेची निवडणूक आपणच जिंकणार असल्याचे बहुजन विकास आघाडी तर्फे बोलण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील यांनी newswithchai.com शी दिलखुलास संवाद साधत निवडणुकीविषयी आपले विचार मांडले. 

चिन्ह बदलाचा फरक पडणार नाही
चिन्ह बदलाच्या झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे बहुजन विकास आघाडीच्या शिटी या चिन्हाला निवडणूक अधिकाऱ्यांकडून लाल कंदील दाखवण्यात आल्या नंतर निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीला ‘रिक्षा’ हे नवीन चिन्ह मिळाले आहे. या बद्दल बाविआ च्या अजीव पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याचा फायदा आम्हालाच होणार असल्याचे सांगितले. भूतकाळात जितक्यावेळा चिन्ह बदल झाला त्या त्या वेळेस लोकांपर्यंत झालेला बदल पोहोचावा म्हणून अधिक जोमाने प्रचार करण्यात आला आणि बहुजन विकास आघाडीच्या मतांमध्ये २ – ३ % वाढ बघायला मिळाली आहे. त्यामुळे या वेळेस देखील चिन्ह बदलाचा आम्हाला फायदाच होईल असे त्यांनी newswithchai.com शी बोलतांना सांगितले.

बूथ लेव्हल प्रचारास प्राधान्य
बहुजन विकास आघाडीचे सर्व नगरसेवक हे आपल्या वॉर्डात नागरिकांसाठी नेहमीच उपलब्ध असतात, त्यामुळे निवडणूकीत लोकांसमोर जाण्यास कोणत्याही प्रकारचा अवघडलेपणा आम्हाला जाणवत नाही. तसेच आमच्या प्रचारासाठी आम्ही बाहेरून कोणतेही मोठे नेते आयात करत नाहीत, आमचं कामच आमच्या प्रचाराचा मोठा मुद्दा असणार आहे. हितेंद्र ठाकूर, राजीव पाटील, क्षितिज ठाकूर, विलास तरे, मनीषा निमकर सारखे नेते मंडळी देखील आपआपल्या मतदार संघात पक्षाचा प्रचार करीत आहेत.

रिक्षा मिळाल्याने विरोधकांची गोची !
निवडणूक चिन्ह रिक्षा मिळाल्याने आम्हाला तोटा न होता नफाच होणार आहे, यामुळे विरोधकांची मोठी कोंडी झाली असून निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना ‘रिक्षा’ वापरण्याचे सोडून आपला प्रचार टूव्हीलर किंवा इतर गाड्यांमध्ये करावा लागत आहे. पण कितीही केले तरी रस्त्यावरच्या रिक्षा तूम्ही कशा बंद करणार ? अगदी मतदानाच्या दिवशी सुद्धा अप्रत्यक्षपणे आमचा प्रचार सुरूच राहणार आहे त्यामुळे निवडणुकीत रिक्षा जोरात धावणार हे मात्र नक्की असे देखील पाटील म्हणाले.

मतांचे समीकरण
पालघर लोकसभा मतदार संघात एकूण सुमारे १८ लाख मतदार असून सामान्यपणे येथे सुमारे ५० ते ५५% इतके मतदान होते. गेल्या लाटेत सुद्धा बविआ ला सुमारे २ लाख मते मिळाली होती, या वेळेस (अंदाजे) ७० हजार ते १ लाख कम्युनिस्ट पक्ष + १ लाख आघाडी (काँग्रेस + राष्ट्रवादी ) आणि नवीन मते अशी एकूण ५ ते ५.५ लाख मते आम्हाला मिळू शकतात त्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय हा नक्की असणार आहे.