जगातील सर्वात मोठा ७९२ तास कराओके गायनाचा जागतिक विश्वविक्रम हा चीन च्या नावे असून तो मोडीत काढून नवीन १००० तासांचा विश्वविक्रम भारताच्या नावे करण्याचा विराग मधुमालती यांनी संकल्प केला आहे. याबाबत आयोजिका वंदना वानखडे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची नुकतीच भेट घेऊन यांनी लवकरच होणाऱ्या जागतिक विश्वविक्रम या उपक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी तावडे यांनी या राष्ट्रीय एकात्मतेला समर्पित आणि अवयवदान, बेटी बचाओ – बेटी पढ़ाओ, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कैंपस विथ हेलमेट, सेव्ह वॉटर – सेव्ह ट्रीज या ज्वलंत सामाजिक उपक्रमांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विराग मधुमालती व त्यांच्या टीमचे कौतूक केले. प्रत्येकी ८ दिवस वरील पैकी प्रत्येक उपक्रमाला समर्पित केले जातील. सध्याचा हा विश्वविक्रम करण्यासाठी गायकांची निवड सुरू झाली असून १० वर्ष ते ७० वर्ष वय असलेले कुणीही गायक कलाकार यात भाग घेऊ शकतात. विविध कलाकार, विविध संस्कृती व विविध भाषांचा समावेश असलेला हा स्वरांचा महाकुंभ असून त्यात संपूर्ण भारतातील गायक कलाकारांच्या आवाजाची किमया संपूर्ण विश्वाला ऐकायला मिळणार आहे. हा अखंड संगीत यज्ञ म्हणजे कलारसिकांसाठी एक संगीत मेजवानी ठरणार आहे. साधारण १८००० ते २०००० गाणी सादर केली जाणार आहेत. ८ जून ते १७ जुलै पर्यंत (सलग ४० दिवस) या विश्वविक्रमाला गवसणी घातली जाणार आहे. शिवाय या ऐतिहासिक कार्यक्रमादरम्यान नेत्रदान व अवयवदानाचे इच्छापत्र देखील स्वीकारले जाणार आहेत.

या नवीन विश्वविक्रमाने देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल शिवाय वरील ज्वलंत सामाजिक उपक्रमांची जनजागृती देखील होणार आहे. विराग मधुमालती यांनी आजवर चारदा जागतिक विश्वविक्रम केले असून राष्ट्रीय एकात्मता व नेत्रदान जनजागृती साठी समर्पित केले आहे. दिव्यांगांच्या वेदना व भावना अनुभवण्यासाठी विराग ने १०० दिवस स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डोळ्यांवर पट्टी बांधून दिव्यांगांचे जीवन व्यतीत केले व त्या दरम्यान जागोजागी अनेक जन प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन नेत्रदान जनजागृती केली होती. पार्श्र्वगायक व सिनेसृष्टीतील कलाकार या दरम्यान उपस्थित राहणार आहेत.