नेरुळ सेक्टर २० गावालगत असलेल्या जयवंती को.ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आवारात झालेल्या दुकानांनी व्यापलेल्या मार्जिनल स्पेसवर पालिकेने तोडक कारवाई केली. या इमारतीतील दुकानदारांनी अवैधरित्या दुकानांची मार्जिनल स्पेस व्यापली होती. तर काही दुकानांनी थेट शेड व पत्र्याचे पार्टिशन टाकून मार्जिनल स्पेसमध्ये दुसरे दुकानच उघडले होते. ही बाब लक्षात घेत पालिकेने कारवाई केली.

नवी मुंबईत मार्जिनल स्पेस वापराचा मुद्दा गाजतो आहे. त्यावर पालिका वेळोवेळी कारवाई करत असते. सेक्टर २० येथील रेल्वे स्थानकासमोर असलेल्या जयवंती सोसायटीत मार्जनील स्पेसचा वापर केला गेल्याचे लक्षात आले होते. त्याबाबत सोसायटीने पालिकेकडे तक्रार केली होती. या दुकानदारांनी सोसायटीच्या पदाधिकऱ्यांना न जुमानता थेट मार्जिनल स्पेसमध्ये पत्र्याचे पार्टिशन टाकून जागा अडवून दुकान बांधले होते.त्यात बेकरी, वाणी व चायनिज अशी दुकाने थाटली होती. ते पाहून इतर दुकानांनी शेड टाकून वापर सुरू केला होता. याबाबत पालिकेने नोटीस देऊन या दुकानदारांना जागा मोकळी करण्यास सांगितले होते.मात्र पालिकेला न जुमानता दुकानदारांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता. चायनीज दुकानामुळे सोसायटी तसेच इतर सोसायट्यांतील रहिवाशांना त्रासास सामोरे जावे लागत होते. या चायनीज दुकानावर उघड्यावर दारू पिऊन भांडणे व मारामाऱ्या सर्रास होत असल्याने नागरिक त्रासले होते. ही सर्व बाब लक्षात घेत पालिकेने या सर्व दुकानांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई मार्जिनल स्पेस मोकळी केली.