नागरीकांनी नोंदवल्या उत्स्फूर्तपणे हरकती पालिका अधिकारी देखील संभ्रमात
तर व्यवसायिकांसाठी वृक्ष स्थलांतरित करणार असल्याचा संशय

नवी मुंबई महापालिका रस्ता रुंदीकरणासाठी सानपाडा येथील ८१ झाडांचा बळी देणार आहे. मात्र या प्रकारावर स्थानिक नागरिकांनी हरकत घेल्यामुळे दि. २० मे रोजी उद्यान विभागाने जनसुनावणी ठेवली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेच्या हद्दीतील मार्ग असतानाही पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाचा दाखला देऊन झाडांचे स्थलांतरण कसे योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

सानपाडा सेक्टर ८ येथील भूखंड क्रमांक १२ ते २१ भोवती तब्बल ८१ पूर्ण वाढलेले वृक्ष
नागरिकांना सावली देत उभे आहेत.त्यामुळे हा मार्ग सानपाडा वासीयांचा सर्वात आवडता बनला आहे. पहाटे व सायंकाळी नागरिक येथे चालणे पसंत करत आहेत. तर सध्या सूर्य आग ओकत असतानाही तीव्र उन्हाच्या झळा या वृक्षांमुळे अडवल्या जात असल्याने हा भाग थंड वाटतो. दर पावसाळ्यात येथील नागरिकांनी झाडे लावतात. पावसाळा संपल्यावर देखील दररोज पाणी घातले जाते. आशा दक्ष व पर्यावरण प्रेमी नागरिकांमुळे ही ८१ तसेच इतर भागांतील रोपे पूर्ण वाढून त्यांचे वृक्षांत रूपांतर झाले आहे.त्यामुळे पालिकेकडून हे वृक्ष कोणासाठी स्थलांतरित केले जात आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा रस्ता सिडको बनवत आहे. मात्र वृक्ष प्राधिकरण विभाग हा पालिकेकडे असल्याने हे प्रकरण पालिकेकडे आलेले आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने याबबत मान्यता दिली आहे. मात्र नागरिकांच्या हरकती आल्यावर याबाबत सिडकोसोबत बैठक घेऊन खरोखर ही झाडे काढण्याची शक्यता आहे का अशी विचारणा करण्यात येईल. याबाबत आयुक्तांची मान्यता घेऊनच पुढील कारवाई करून घेण्यात येईल.
नीतीन काळे
उद्यान विभाग अधिकारी
नवी मुंबई महापालिका

सानपाड्यातील नागरिकांनी ही रोपे लावून ती वाढवलेली आहेत. पूर्ण वाढल्यावर या रस्त्याला झाडांनी संपूर्ण वेढल्यामुळे सुखद अनुभव मिळतो.पालिका दर वर्षी पावसाळ्यात झाडे लावण्याचे आवाहन करत उपक्रम राबवले.मात्र इतके मोठे वृक्ष कसे काय तोडणार असा प्रश्न पडतो. आमचा संशय आहे की, बांधकाम व्यवसायिकांसाठी ही झाडे तोडण्यात येत आहे.
(मिलिंद सूर्यराव
स्थानिक नागरिक)

पर्यावरणप्रेमींनी अथक प्रयत्नांनी वाढवले वृक्ष
पालिकेला उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. सध्या नवी मुंबईत वेगाने बांधकाम होत असताना सिमेंटच्या जंगलात रूपांतर झाले आहे. मात्र तरीही पर्यावरण प्रेमींनी अनेक प्रयत्न करून नवी मुंबईत वृक्ष लावले, टीकवले व जगवले आहेत.सानपाड्यात ८१ वृक्ष हे असेच जगवले गेले आहेत.

आयुक्तांनी नेरुळ येथील झाडे हलवण्याची मागणी धुडकवली
नेरुळ सेक्टर १९ ए येथे असलेल्या आर टी ओ ट्रॅककंचया शेजारी स्थानिक नगरसेवकाने ७० पेक्षा जास्त वृक्ष स्थलांतरित करून रस्ता बनवण्याची मागणी केली होती. मात्र पर्यावरण प्रेमी असलेले आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांनी मात्र ही मागणी फेटाळून लावून अनेक वर्षे वाढवलेले वृक्षांची स्वार्थासाठी होणारी कत्तल वाचवली होती. त्यामुळे हेच आयुक्त सानपाडा येथील ८१ वृक्ष वाचवून सानपाडा येथील पर्यावरण वाचवणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्थलांतरित झाडे टिकण्याची शक्यता कमी
ही झाडे स्थलांतरित करण्यात येणार आहेत. मात्र याआधी पालिकेने बेलापूर आम्र मार्गावरील झाडे स्थलांतरित केली होती. जे एन पी टी ने ही झाडे स्थलांतरित करून ज्वेल ऑफ नवी मुंबईत लावली होती. मात्र या स्थलांतरित झाडांपैकी किती झाडे जगली हा प्रश्नच उरलेला दिसत आहे. त्यामुळे सानपाडा येथील झाडे स्थलांतरित केल्यावर टिकण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.