१, २, ५ आणि  १० रुपयांच्या नाण्यानंतर आता २० रुपयांचे नवे नाणे भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे चलनात आले आहे. विशेष करून दृष्टिहीन लोकांसाठी डिझाईन करण्यात आलेले हे २० रुपयांचे नाणे गुरुवारी ७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कायद्यानुसार भारतात जारी करण्यात आलेल्या सर्व नवीन नाण्यांमध्ये हे २० रुपयांचे नाणे दृष्टिहीन नागरिकांची गरज लक्षात घेऊन बनवण्यात आलेले नाणे आहे.

२० रुपये मूल्याच्या या नाण्याचे डिझाईन साधारणतः १० रुपयांच्या नाण्यांप्रमाणेच आहे. या नाण्याचा व्यास २७ मिलीमीटर (२. ७ सेमी) असून आतल्या बाजूने डिस्क आणि बाहेरच्या बाजूने रिंग आहे. तसेच जुन्या २ रुपयांच्या नाण्याप्रमाणे या नाण्याला १२ कडा आहेत. अंध व्यक्तींनादेखील हे नाणे हाताळता यावे याप्रकारे याची डिझाईन करण्यात आली आहे. नाण्याच्या किनाऱ्यावर कोणतेच चिन्ह नाही. या नाण्याची बाहेरील कडा ६५% कॉपर, १५% झिंक आणि २०% निकेल धातूंची असून आतील कडा ७५ % कॉपर, २०% झिंक आणि ५% निकेल या धातूंनी बनलेली आहे. 

१० वर्षांपूर्वी म्हणजे २००९ मध्ये आरबीआयने १० रुपयांचे नाणे बाजारात आणले होते. त्यानंतर आता २० रुपयांचे नाणे बाजारात आणले आहे. नोटा पाच वर्षापर्यंत चांगल्या राहतात असे मानले जाते. तर नाणी नेहमीच दिर्घकाळ चालतात. नोटा ठराविक काळानंतर खराब होणार म्हणून अधिक काळ टिकणारी नाणी चलनात आणली जात आहेत.