नवीमुंबई (बातमीदार): बेलापूर मतदार संघातून वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार गौतम गायकवाड आणि भारिपचे कार्यकर्ते यांचा प्रचाराचा आणि त्यांना वाढता पाठींबा मतदार संघाची गणिते बिघडवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणापासून विविध समाजातील लोक प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागे उभे आहेत. शिवाय बहुजन समाजातील वंचित हा आंबेडकरांच्या चळवळीत जोडला गेला आहे. त्यामुळे वंचितचे वाढत चालेले प्राबल्य अनेक ठिकणी अधोरेखित होत असल्याचे चित्र आहे.

बेलापूर ते वाशी येथे पार पडलेल्या पदयात्रेत अनेक वाहने व सामील झालेले हजारो कार्यकर्ते, मतदार यामुळे वंचितचा उमेदवार या ठिकाणी चांगले मताधिक्य घेऊन मुसंडी मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा पहिल्या क्रमाकावर घेतला असल्याने अनेक प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे कौतुक केल्याचे सांगितले जात आहे. त्यात नोटाला मतदान हि प्रकल्पग्रस्तांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन प्रकल्पग्रस्तांना आपलेसे करण्याचा प्रयत्न गायकवाड करा आहेत. शिवाय अनेक पक्षातील नाराज अर्थात त्यांच्या मते वंचित कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भेटी  घेणार असून अनेकांची मने वळवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय अनेक धर्मीय व समाजातील लोक अप्रत्यक्षरित्या त्यांचे मागे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरूळ व बेलापूर परिसरातून त्यांना मतांची चांगली आघाडी मिळेल अस विश्वास देखील त्यांनी व्यक्त केल्याने बेलापूर मतदार संघाची गणिते बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोक गायकवाडांच्या रिक्षा चिन्हाला पसंती देतील असा विश्वास त्यांनी पदयात्रेची सांगता करताना व्यक्त केला.